बुधवार, १८ जानेवारी, २०२३

गुलाबी गच्ची 😆😝💕💞 भाग -१

गुलाबी गच्ची 😆😝💕💞
भाग -१


 "अगं फार उशीर झालाय, बघ नं अजून कसा आला नाही 'हा?' मनवाने हिरमुसून स्वातीला प्रश्न विचारला. मावळतीचा सूर्य एव्हाना लुप्त होऊ लागला होता. तशी मनवाची चलबिचल आणखीनच वाढत होती. 'त्या'चे दर्शन न झाल्याने तिचा पुरता हिरमोड झाल्याचं तिच्या चेह-यावरून साफ दिसत होतं. आधीच चेहरा गोलमटोल, त्यात गोबरे गोबरे गाल. गालांचा फुगवटा आज जरा जास्तच जाणवत होता. कुठे चिमणीपाखरांचा थवा शिस्तबध्दरित्या आपआपल्या घरट्यात परतत होता. कॉलनीच्या मैदानावर क्रिकेट खेळणा-या मुलांचा खेळ पण एव्हाना संपण्यातच जमा होता. प्रत्येकाच्या आया आपआपल्या मुलांना हाका मारून घरी बोलावत होत्या. कॉलनीतल्या अंतर्गत रस्त्यांवर तुरळक माणसं होती. बहुतेक चाकरमानी कामावरून दमून-थकून घरी परतत असावेत. सूर्याच्या लालीने सबंध अवकाश व्यापून गेले होते. जणू काही मनवाचं असं हिरमुसण बघून अवकाश सुध्दा रागावून लालबुंद झाले असावे.

दररोज कॉलनीतील स्वाती रहात असलेल्या आरएस ७  बिल्डींगच्या गच्चीवर येऊन समोरच्या आरएस १० कडे एकटक बघत बसणे हा आता मनवाचा नित्यक्रमच होऊन बसलेला. मनवाबरोबर स्वाती पण गच्चीवर येऊन बसायची. या दोघींची जोडी तशी शाळेपासूनच होती. बालवर्गापासून दोघीही एकत्रच असायच्या, ते अगदी कॉलेजपर्यंत. शाळेतपण एकाच बाकावर, त्यामुळे एकमेकींची आवडनिवड, छंद, दोघींच्या घरचे सगळे एकमेकांना चांगलंच ओळखत होते.

संध्याकाळचे ७ वाजून गेले तरी स्वाती खाली आली नाही हे तिच्या आईच्या लक्षात आले. ७ वाजले की हात-पाय स्वच्छ धुऊन तुळशीसमोर हात जोडून 'शुभंकरोती' म्हणायचे हा तिच्या आईचा दंडक होता. ती दुस-या मजल्यावरील त्यांच्या घरासमोरील मोकळ्या पॅसेजमधून मान तिरपी करून गच्चीच्या दिशेने स्वातीला हाका मारू लागली. गप्पांमध्ये रमलेल्या दोघींची तंद्री स्वातीच्या आईच्या ओरडण्याने भंग पावली. स्वत:च्याच विश्वात रममाण झालेल्या मनवाचं मन आता फारच खट्टू झालं होतं. महत्प्रयासानं भानावर आलेल्या मनवाला आता स्वातीची आई व्हिलन वाटू लागली. मनवाने स्वातीकडे एक नजर टाकली आणि नकारार्थी मान हलवत तिला "चल ,खाली जाऊया" म्हणाली. मनवाच्या मते आजचा दिवस फुकट गेला होता. मुलींची लक्षणं काही ठीक नाहीत हे स्वातीच्या आईने चांगलेच हेरले होते. 

क्रमश: 
Copywrite : Vasudha Dhumak
Date : 22/1/2021

३ टिप्पण्या: