"हुश्श नशीब छोटी काही बोलायच्या आत मी तिचं तोंड बंदं केलं" स्वत:शीच पुटपूटत मनवानं सुटकेचा नि:श्वास सोडला. अस्मिता आणि मनवा दोघीही आपआपल्या कामाला लागल्या. मनवाची आई स्वयंपाकघरात होती. रात्रीचे ८ वाजले होते. त्यांचे बाबा अद्याप कामावरून घरी आले नव्हते. मनवाचे बाबा आल्यावर गप्पा मारत सगळ्यांची जेवणं आटपली. झोपायला आज तसा फार उशीरच झालेला, पण मनवाला कसली झोप लागतेय! सगळ्यांची निजानीज झाली पण मनूच्या मनात एकच विचार पिंगा घालत होते. विचारांच्या गर्तेत कधी झोप लागली तिला कळलेदेखील नाही.
समोरचे दृश्य फारच विलोभनीय होते. एखाद्या सुंदर चित्रासारखे. निळेशुभ्र पांघरलेले आकाश, सूर्याची कोवळी किरणे आपला सोनेरी प्रकाश पसरवत होती. हिरव्याकंच झाडांवर बसलेले पक्षी किलबिलत होते. एका लाकडी बाकावर एखाद्या परीसारखा पांढराशुभ्र फ्रॉक घालून मनू बसलेली आणि समोरून 'तो' तिच्या दिशेने एक-एक पाऊल टाकत पुढे झेपावत होता. त्या 'त्या'च्या प्रत्येक पावलागणीक तिच्या ह्रदयाची धडधड वाढत होती. ज्या क्षणाची आपण इतक्या आतुरतेने वाट पहात होतो तो क्षण आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत यावर मनूचा विश्वासच बसेना. त्यामुळे मनूने डोळे घट्ट मिटून घेतलेले. जणूकाही डोळे बंद करून ती तो क्षण कायमचा तसाच गोठवून ठेवणार होती. 'तो' जवळ येऊन तिच्या शेजारी लाकडी बाकावर बसणार इतक्यातच 'टिक् टिक् टिक् टिक.....' आवाजानं तिला जाग आली. घड्याळाचा गजर झालेला.
समोर पाहते तर काय ! त्यांच्या घराच्या दिवाणखान्यात ती होती. काही अंतरावर अस्मिता घोरत पडलेली. समोर तो लाकडी बाक, हिरवीगार झाडं, त्यावर बसलेले पक्षी, त्यांचा किलबिलाट, तिने घातलेला पांढराशुभ्र झगा आणि 'तो' कुठेच दिसत नव्हता. म्हणजे आपल्याला स्वप्न पडलेलं होतं. एक हाथ कपाळावर आपटत ती स्वत:ची फजिती झाल्यानं खट्टू झाली. एकाएकी तिला फार उदास वाटू लागलं. "शी बाई हे स्वप्न होतं तर. पण जर स्वप्न सत्यात उतरलं तर ? कित्ती मज्जा येईल नं" असं स्वत:शीच पुटपूटत स्वप्नरंजनात गढून गेली. स्वप्नात रममाण झालेल्या मनूला छान गाढ झोप लागली.
क्रमश:

नाव अगदी सुरेख आहे गुलाबी गच्ची.निसर्गा चे सुरेख चित्रण रेखातलं आहे.
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏. कृपया, ब्लॉग फॉलो करा
उत्तर द्याहटवाखूपच छान. नाव अतिशय सुंदर आहेत .खरंतर या स्वप्नां मुळेच आपण आयुष्यातील कित्येक क्षण सुखात आनंदात घालवत असतो.
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏 तुझं असच प्रेम राहू दे
हटवा