हरवत चाललेली मी !
मी स्वत:ला हरवत चालली आहे का ? हा प्रश्न आजकाल सतत डोकावत असतो. कदाचित माझ्या अतिविचार करण्याच्या वृत्तीमुळे यांची प्रकर्षता अधिक जाणवत असावी. मी सध्या काय करते हा प्रश्न जरी स्वतःला विचारला तरी स्वतःसाठी काय ? हा प्रतिप्रश्न उद्भवतोच. आणि त्याचे उत्तर 'काहीच नाही' असते.
सकाळी उठल्यापासून अंथरूणं आवरणे, झाडू इ.कामांचा उरक, माझा २ वर्ष २ महिन्यांचा मुलगा श्रीनिश, त्याचे दात घासणे, त्याला सकाळी गरम पाणी पाजणे, त्याची अंघोळ, नास्त्याची तयारी(भाज्या धुऊन, चिरणे किंवा त्यासाठी आईला कामाला लावायचं म्हणजे आपली ५ मिनीटं तरी वाचतात). लसूण सोलणे ही छोटी-छोटी पण वेळकाढू कामे आई-बाबांकडून करवून घेता येतात.
एकीकडे फ्रीजमध्ये कुठली भाजी आहे हे तपासणे. दूध, नास्ता, भाज्या कुठल्या आणायच्या हे ठरवणे आणि तसे आणायला सांगणे. आणलेले दूध गरम करणे, कुकरसाठी डाळ-तांदुळ धुणे या सगळ्यांमध्ये सकाळचे १०.३० कधी वाजतात कळत नाही. बरं हे सोपस्कार पार पाडत असताना आमचं लेकरू किमान ५-६ वेळा तरी किचनमध्ये येऊन 'आई-आई मला हे हवं, , 'मला बिच्किट पायजे' असे हट्ट करत असतं. किचनमध्ये येऊन मला मिठी मारणं, भांडी ठेवलेले ड्राॅवर ओढून पळ्या काढणे, त्याचा बॅट म्हणून वापर करत चौकार-षटकार मारण्याचा पराक्रम सुरू असतो. त्याची मनधरणी करत खाऊ घालणं म्हणजे कसरतच म्हणायची. हे लिहीतानासुध्दा मला कौतुकसदृश्य हसू येतंय. याला काय म्हणावं ? एका आईचं आपल्या मुलावर असलेलं निखळ प्रेम !
बरं इतकी सगळी व्यवधानं सांभाळत असताना एखाद्या पदार्थात किती जिन्नस घालायचे, त्यांचं प्रमाण किती असावं याचा अचूक अंदाज कधीही चुकत नाही. हे सगळं घडत असताना श्रीनिशच्या शी -शू चा कार्यक्रम सुरूच असतो. इथे किचनमधल्या कामातून टाईम प्लीज घेऊन त्याच्याकडे धाव घ्यावी लागते. सगळ्यांच्या नास्त्याच्या प्लेटस देऊन मग स्वतः नास्ता घ्यायचा. मुलाची अंघोळ, पीठ मळणे, स्वतःची अंघोळीमध्ये सकाळचे ११.३० होतात. मग मेडिटेशनसाठी पण बसता येत नाही. श्रीनिशची काळजी, त्याला हवं-नको ते बघणं, त्यावर संस्कार करणं, चांगल्या गोष्टी शिकवणं यामध्येच समस्त 'आयां' चा वेळ मोडतो. ही वेळ खरंतर 'ति'च्या कसोटीची असते. कारण एकीकडे मुलांचे संगोपन इ., सासू-सासरे सोबत असले की, त्यांची सरबराई करणे, नवरोबाच्या इच्छा पूर्ण करणे यामध्येच बाईचा बराचसा वेळ जातो. या धबडग्यात 'ती' बिचारी स्वतःसाठी वेळ कसा काढणार ? कामांचा रहाटगाडा संपला की ती थोडी विश्रांती घेईल, टीव्ही बघेल. पण मग तिच्या शिक्षणाचं काय? स्वप्नांचं काय ? या विषयावर ती आणि तिच्या 'अहों'नी एकत्र बसून सविस्तर चर्चा करायला हवी. ती एकटी किती झिजणार ? हा फार गंभीर प्रश्न आहे.
शतकानुशतके हा प्रश्न विचारला जात आहे. त्यावर कुटुंबात, मित्र- मैत्रिणींमध्ये, समवयस्क स्त्रियांमध्ये, समाजमाध्यमात, समाजामध्ये चर्चा व्हायला हवी. स्त्रीने खचून न जाता आपली ताकद ओळखावी. तिनं स्वतःची लढाई सुरू ठेवावी. एका हाती उलथणं आणि दुस-या हातात लेखणी (माझ्या कामानुसार) घेऊन ती सगळ्या समाजाचा सामना करू शकते, सगळ्या जगाशी लढू शकते आणि ते जिंकूही शकते.

Mast 👌👌👍👍
उत्तर द्याहटवाThank you 😊
उत्तर द्याहटवा